Sunday, October 11, 2026

संघर्ष‘‘योध्दे’’ विजूभाऊ ……..!

अगदी बालवयातच वडिलांचे छत्र हरपलेला एक बालक आपल्या कुटुंबासह गडचिरोली गाठतो.जिवन जगण्यासाठी लहानपणापासून प्रचंड संघर्ष करतो.आपल्या वाटयाला आलेल्या व्यथा,वेदना या अनेकांच्याही आहेत.याची जाणीव ठेवतो.अनं तिथून चळवळ उभी करतो.गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अनं संवेदनशिल भागातील गावागावात बिनधास्तपणे फिरतो.अनं अनेकांना नवी उमेद दाखवितो.आक्रमक बाणा ठेवीत प्रस्थापितांच्या चुकीच्या धोरणांचा धिक्कार करतो.आंदोलनातून संघठनबांधणी करित एल्गाराची मशाल पेटवितो.यशाची एक एक शिखर पादाक्रांत करतो.अनं मगं वनविकास महामंडळाचा अध्यक्ष,विधानपरिषद,विधानसभेचे आमदार,राज्यमंत्री,कॅबीनेट मंत्री अनं पक्षाच्या विधीमंडळ नेता होतो.करंजीचे भुमीपूत्र,काॅग्रेसचे जेष्ठ नेते,आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हा प्रवास अनेकांना नवी दृष्टी,प्रेरणा देणारा ठरलाय.करंजीपासून सुरू झालेल्या या संघर्षाचा हा प्रवास आज दिल्लीतही आपला आवाज बुलंद करतो आहे.
राज्यातील शेवटच्या टोकावरील चंदपूूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील कंरजी हे गांव.याच गावाच्या मातीतून विजयभाऊ पुढे आले.वडील नामदेवराव गावचे सरपंच होते.एक दुखद घटना घडली.त्यांच्या वडिलांचे निधन झाले.अनं परिवारात दुखांचे डोंगर कोसळले.आई कमलाईने परिस्थिती बघता कुटुंबाला घेत गडचिरोली गाठली.बालवयातच गरीबीचे चटके सोसणा-या विजूभाउंनी मग आपल्या वेदनांना बाजुला सारले.प्रचंड कष्ट सोसले.आपल्यासह अनेकांना मुख्य प्रवाहात आणले.अनेक तरूणांचे संघटन निर्माण केले.मुळात काॅग्रेसचे असलेल्या विजुभाऊंना बाळासाहेबांच्या शिवसेनेतून राजकीय प्रेरणा मिळाली.अनं त्यातूनच त्यांनी जागृतीचे जाळे उभारले.

बाळासाहेबांनी घेतली विशेष दखल….!

राज्याच्या शेवटच्या टोकावरील नक्षल्यांच्या गडात एक उमदा तरूण गावागावात जात बिनधास्तपणे काम करित आहे.तरूणांना एकत्र आणीत आहे.पक्षाला वाढवित आहे.हि बाब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर गेली.अनं मग काय त्यांनी विजूभाऊची विशेष दखल घेतली.त्यांना वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले.येथूनच त्यांना राजकीय नवी दिशा मिळाली.

मग झाले मंत्री…..!

विजुभाऊ मुळात काॅग्रेसचे.शिवसेनेतून ते काॅग्रेसमध्ये आपल्या स्वगृही परतले.अनं आपल्या कुशल नेतृत्वाने त्यांनी अनेकांचे मन जिंकलीत.राज्यमंत्री कॅबीनेट मंत्री ते राज्याचे विरोधी पक्षनेते,काॅग्रेसचे विधीमंडळ नेते हा त्यांचा प्रवास आहे.अनेकदा त्यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न झाले.पण मी जेलमध्ये जाणे पंसत करेल पण भाजपत जाणार नाही.हि त्यांची भुमिका आहे.

आप्तजनांसाठी घेतली धाव….!
काही वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली.करंजी येथील मोठे तलाव फुटले.गाव पाण्याखाली आला.चौफेर हाहाकार माजला.अनं आपत्ती ओढावली.अशा स्थितीत विजूभाऊ आपल्या गावातील लोकांसाठी देवदूत ठरले.ते स्वत गावात आले.गावकर्यांना मदतीचा हात दिला.

कमलाईचे प्रेम…!

विजूभाउच्या आई कमलताई वडेट्टीवार यांचा करंजी गावाशी अतिशय आपुलकीचे नाते होते.नुकतेच त्यांचे निधन झाले.वडेट्टीवार कुटुंबिय गेल्या काही वर्षापासून नागपूरात वास्तव्यास आहे.पण कमलाईंना गावाशी नाळ नेहमीच कायम ठेवली.म्हणूनच गावातील कुणीही नागपूरला गेला कि,त्यांच्या घरी जायचा.त्यांची भेट घ्यायचा.कमलाई अतिशय आपुलकीने त्यांची विचारपूस करायची.जेवनाशिवाय त्यांना जाउ दयायची नाही.काम असेल तर मुक्कामाचाही आग्रह धरायची.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावापासून सुरू झालेला विजुभाउंचा प्रवास आज राज्याच्या उच्च स्थानापर्यत पोहचला आहे.त्यांचा राजकीय प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणेची मशाल देणारा ठरला आहे.करंजीचे भुमिपूत्र आदरणीय विजुभाउ वडेट्टीवार यांचा आज वाढदिवस आहे.त्यांना वाढदिवसानिमीत्ताने अनेकानेक शुभेच्छा….

लेखक:
तुकेश वानोडे हे गोंडपिपरीच्या पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत.
त्यांनी अनेकदा करंजीचे सरपंचपद भुषविले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!