चंद्रपूर:-
डोळयातील अश्रू बघून मतदान कराल.तर येणा-या पाच वर्षात अश्रूच बघावे लागतील,असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.त्याला प्रत्यूत्तर देतांना प्रतिभा धानोरकर यांनी मी रडणारी नाही,तर लढणारी आहे.एका विधवेच्या भावनांचा तुम्ही अनादर करता,जिल्हयातील मायाबहिणी तुम्हाला माफ करणार नसल्याचे जाहीर सभेत सांगितले.दरम्यान आज मुनगंटीवारांनी धानोरकरांना चांगलाच टोला लगावला.काल धानोरकरांनी माझ्यावर टिका केली.त्यांना हे माहित नाही कि मी जे मांडु शकतो.ते त्यांच्या दहा पिढयाही मांडू शकत नाही.त्यांचे शिक्षण किती,माझे किती,त्यांचा अनुभव किती अनं माझा किती.यावेळेस मी काही बोलणार नाही.पुढच्या सभेत इशारा देईन.पण त्यांनतर बोलायला लागलो तर खैर नाही.असे सांगत त्यांनी प्रतिभा धानोरकरांना इशाराच दिला.यवतमाळ जिहयातील आर्णी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच पेटली आहे.भाजपने या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.तर काॅग्रेसकडून प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत.चंद्रपूरच्या या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपुरात भाजप,काॅग्रेस मध्ये वार पे वार सुरू आहेत.अश्रू,जात,विकास अनं सहानुभूती या विषयाला घेत आरोप प्रत्यारोपाच्या फे-या झाडल्या जात आहेत.प्रतिभा धानोरकरांना काॅग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.यांनतर त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ कार्यकर्ते चांगलेच भावनिक झाले होते.यावेळी प्रतिभा धानोरकर यांच्या डोळयातून अश्रू आले.याच मुदयावरून आपला अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी विकास हाच आपला एजेंडा असल्याचे सांगितले.डोळयातील अश्रू बघून मतदान कराल तर पुढची पाच वर्ष अश्रूच बघावे लागतील.असा टोमणा त्यांनी धानोकरांवर मारला होता.यानंतर कालच्या काॅग्रेसच्या शक्तीप्रदर्शनातून प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना चांगलेच धारेवर धरले.एका विधवाच्या भावनांचा अनादर करणा-यांना मायाबहिणी माफ करणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
आज सुधीर मुनगंटीवार आर्णी येथे होते.महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले.विकास हाच आपला अजेंडा असल्याचे ते म्हणाले.यवतमाळ जिल्हयाच्या विकासाला आपण नेहमीच चालना दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमीत शाह यांच्या आग्रहाने मी उमेदवारी स्विकारली.पक्षाध्यक्ष जे.पी नडडा यांना तर मी स्पष्टच सांगितल.लोकसभेची निवडणूक लढवितो.पण मला विकासकामांची “गॅरंटी” हवी आहे.यावेळी विविध पक्षातील पाचशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आतापासूनच कमालीची लढत बघायला मिळत आहे.मुनगंटीवार,धानोरकरांनी आपले शक्तीप्रदर्शन करीत आपआपली ताकद दाखवून दिली आहे.येणा-या दिवसात त्यांच्यातील लढाई अधिक तिव्र होणार आहे.



