
चंद्रपूर :-
गडचांदूर येथे नगाराची बटन दाबल्यानंतर कमळाचा लाईट लागला यामुळे संतापलेल्या मतदाराने ईव्हिएम मशीन फोडून टाकली.तर राजु-यात पैसे वाटतांना भाजपचे नेत्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनांनतर आता गडचांदूर येथे भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावाला विटाने मारून गंभीर जखमी केले.तर पोंभुर्णा तालुका काॅग्रेसचे युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांना खंडणीप्रकरणात रामनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करित अटक केली आहे.या संपूर्ण घटनाक्रमांची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.
राजुरा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात मोठया प्रमाणावर पैसे वाटले जात आहेत.दोन हजाराचे टोकन घ्या,मतदान करा अनं नंतर तिन हजार रूपये घ्या असा प्रकार सुरू असल्याचा आरोप खासदार प्रतीभा धानोरकर यांनी केला होता.त्यांच्या आरोपानंतर चांगलीच खळबळ माजली होती.
दरम्यान काल दि.2 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडली.भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला विट फेकून मारली. यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गडचांदुर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे प्रभाग ९ उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरज पांडे ह्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, भाजपने त्याला उमेदवारी दिल्याने भाजपविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त होत आहे. गुन्हेगाराला लोकांच्या स्वाधीन करा म्हणून पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शहरामधील वातावरण दूषित झाले असून त्याला त्वरित तडीपार करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्ते करीत आहे. निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी शहरामधून रॅली काढून बाजार बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.
वैभव पिंपळशेंडे वर खंडणीचा गुन्हा
पोंभुर्णा तालुक्यातील काँग्रेस चे नेते वैभव पिंपळशेंडे यांच्याविरोधात काल उशिरा रामनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करीत अटक केली.दोन दिवसाअगोदर चंद्रपुरातील शिवा कोरेवार यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पिंपळशेंडे यांनी मूल पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती.चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा परिसरातील चेक वेऴवा नदी घाटावरील रेती घाट कामात अडथळे निर्माण करून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करत रामनगर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.या प्रकरणातील पुढील तपास चंद्रपूर रामनगर पोलिस करीत आहे.वैभव पिंपळशेंडे हे काँग्रेस चे पोंभुर्णा तालुक्यातील नेते आहेत.गेल्या काही दिवसापासून त्यांनी घाटकुळ येथील मोठा शेतकरी घोटाळा उघड केला होता. सोबतच रेतीघाटाच्या मुद्द्यावर स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावा अशी मागणी रेटून धरली होती दरम्यान आता या कार्यवारीनंतर चर्चाना वेग आला आहे.


