
चंद्रपूर :-
राजुरा विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसचा पराभव झाला.दरम्यान आता पुन्हा नव्या दमाने काम करण्यासाठी पक्षाने नवीन टीम करण्याच्या दृष्टीने पाउल टाकले.परवा रात्री यासदंर्भात एक बैठक पार पडली.यात सरपंच तथा युवा नेते देविदास सातपूते यांना तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.एकीकडे नवीन अध्यक्ष झाल्याचा आनंद असतांना दुसरीकडे पक्षाचे जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे यांनी काॅग्रेसला रामराम ठोकला.त्यांच्यापाठोपाठ अनेक जण पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत.दरम्यान पक्ष सोडल्यानंतर तातडीने,बट्टे यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश घेतला.सोबतच सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.
राजुरा विधानसभा मतदारसंघात यावेळी सत्तापरिवर्तन झाले.आमदार सुभाष धोटे यांचा पराभव झाल्याने अनेक कार्यकर्ते नेते आता वेगळी भूमिका घेत आहे.पण काॅग्रेसचे अनेक खंदे कार्यकर्ते अद्यापही पक्षासोबत एकनिष्ठ आहेत.पक्षाला तालुक्यात नवी उभारी देण्यासाठी नेतृत्वाचा बदल करण्याची भुमिका घेण्यात आली.अनं याच माध्यमातून सरपंच देविदास सातपूते यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले.याच बैठकीत अतिशय शुल्लकशा कारणावरून जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे हे बैठक सोडून परतले.दरम्यान दुस-याच दिवशी त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेतली अनं थेट भाजपात प्रवेश घेतला.आता या मुददयावरून काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बट्टे यांच्यावर आगपाखड केली आहे.,बट्टे यांना सत्तापक्षात जायचे होते.यासाठी त्यांनी शोधलेले कारण हे अतिशय हास्यास्पद असल्याचा टोला काॅग्रेस कार्यकर्त्यांनी लगावला.अलीकडे सत्तेसोबत राहण्यासाठी नेतेमंडळी कुठलीही भूमिका घेउ लागली आहे.पण अशा अडचणीच्या स्थितीतही आम्ही देविदास सातपुते यांच्या नेतृत्वात नवी उभारी घेऊ असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.काॅग्रेसचे अनेक स्थानिक नेते भाजपत प्रवेश करित असल्याने भाजपातील प्रामाणीक व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मात्र चांगलीच गोची होत आहे.
काका ..पुतण्याची चर्चा
भाजपने या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला.देवराव भोंगळे आमदार झाले.भोंगळे यांच्या अतिशय विश्वासातील दिपक सातपूते हे गोंडपिपरी तालुक्याचे भाजप अध्यक्ष आहेत.त्यांच्याच नेतृत्वात यावेळी भाजपला पहिल्यांदा तालुक्यात पाच हजार अधिक मतांची आघाडी मिळाली.या मताधिक्याने देवराव भोंगळेंना विजय संपादन करता आला.याउलट नेहमी काँग्रेसला कौल देणाऱ्या तालुक्याने यावेळी मात्र त्यांना इंगा दाखविला.दरम्यान आता देविदास सातपुते या युवा नेतृत्वाला तालुकाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.दिपक सातपूते हे भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत.तर देविदास सातपूते हे काॅग्रेसचे तालुक्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.हे दोघेही काका,पुतणे आहेत.यामुळे आता राजकीय वर्तुळात येणा-या दिवसात कुणाचे वर्चस्व प्रभावी ठरू शकते यावरून आता नवी चर्चा सुरु झाली आहे.
शिंदे गटाचेही लक्ष
काॅग्रेस मधील अनेक नेते,कार्यकर्त्यांनी पक्ष बदलविण्याची भुमिका घेतली आहे.गोंडपिपरी तालुक्यात शिंदे गटाची ताकद नाही.शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बंडु हजारे हे तालुक्याचे भुमिपूत्र आहेत.तर नितीन धानोरकर हे नेते आहेत.दरम्यान आता काॅग्रेसमधील नाराज गटाला आपणाकडे खेचण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.


