
राजकारण आणि प्रामाणिकता, नैतिकता यांचा संबंध हल्ली दुरापास्त झाल्याचे चित्र दिसते. सत्तेच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप, स्वार्थ आणि राजकीय डावपेचांना अधिक महत्त्व प्राप्त झाले असताना, आजही काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत जी सोज्वळपणा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपत राजकारण करतात. सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत, अडचणीच्या काळात मदतीचा हात देत आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करतात.गोंडपिपरी येथील चेतनसिंह गौर हे अशाच संवेदनशील आणि प्रामाणिक राजकारणाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जातात.
गेल्या २५ वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या चेतनसिंह गौर यांनी आपल्या प्रदीर्घ प्रवासात पदापेक्षा माणुसकीला आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज नगरपंचायत गटनेते पदापर्यंत पोहोचला आहे. याच प्रवासात त्यांनी गोंडपिपरी नगराच्या उपनगराध्यक्षपदाची जबाबदारीही सक्षमपणे सांभाळली.
पक्षविस्तारासाठी प्रभावी योगदान
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम करताना चेतनसिंह गौर यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे काम केले. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात गोंडपिपरी तालुक्याचा असलेला कौल विशेष ठरला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे गोंडपिपरी नगराच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मतांची आघाडी घेतली. या यशामागे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच चेतनसिंह गौर यांच्या संघटनात्मक प्रयत्नांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
कोरोनाकाळात माणुसकीची प्रचिती
राजकारणातील पदे आणि जबाबदाऱ्या अनेकांकडे असतात; मात्र संकटाच्या काळात सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लक्षात राहते. कोरोना महामारीच्या कठीण काळात चेतनसिंह गौर यांनी अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. त्या काळातील त्यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अनेकांसाठी आधार ठरली.गरजू, अडचणीत सापडलेले आणि मदतीची अपेक्षा घेऊन येणाऱ्या व्यक्तींना शक्य ती मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आजही अनेकांना भावतो. त्यामुळेच त्यांच्याकडे केवळ राजकीय कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर आपल्या माणसांसाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
विद्यार्थ्यांसाठीही आधाराचा हात
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि वेळोवेळी शक्य ती मदत करणे, हा त्यांच्या सामाजिक कार्याचा आणखी एक सकारात्मक पैलू आहे. ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षणाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी त्यांचा असलेला सकारात्मक दृष्टिकोन अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरतो.
युवा नेतृत्वाची आश्वासक वाटचाल
चेतनसिंह गौर यांच्याकडे आज एक युवा, तडफदार आणि आश्वासक नेतृत्व म्हणून पाहिले जाते. राजकारणात सक्रिय असतानाही सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि नागरिकांशी जपलेली आपुलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू आहे.
राज्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक सातपुते यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षसंघटनेचे काम पुढे नेण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
राजकारणापेक्षा माणुसकी मोठी
आजच्या राजकीय वातावरणात एखाद्या नेत्याची ओळख केवळ त्याच्या पदावरून होत नाही, तर तो सामान्य माणसाच्या सुख-दुःखात किती सहभागी होतो, संकटात किती धावून जातो आणि आपल्या वागण्यात किती माणुसकी जपतो, यावर त्याचे खरे नेतृत्व ठरते.
चेतनसिंह गौर यांच्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास पदे आली, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र सामान्य माणसाशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. म्हणूनच गोंडपिपरीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्याकडे एका संवेदनशील, प्रामाणिक आणि तडफदार नेतृत्वाच्या रूपाने पाहिले जाते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोंडपिपरी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या या आश्वासक नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
संवेदनशील नेतृत्व, प्रामाणिक विचार आणि तडफदार कार्यशैली असलेल्या चेतनसिंह गौर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


