गडचिरोली:-
राज्य सरकार सध्या एकच काम करित आहे.टेंडर काढा पैसे कमवा हेच यांच धोरण आहे.यांना सामान्याविषयी काही देण घेण नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.त्यांना गडचिरोलीच्या आरोग्यसेवेबाबत काहीच करता आले नाही.जिल्हयात आरोग्य यंत्रणा पूरती सलाईनवर आहे.मात्र हि मंडळी केवळ टेंडर काढून पैसे कमविण्यात दंग आहे.असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाची पहाणी केली.तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी सुविधांच्या अभावाला घेत त्यांनी तिव्र संताप व्यक्त केला.
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे, प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे, रात्रपाळी वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे , फायर ऑडिट होऊन देखील योग्य खबरदारी घेतलेली नसणे, रुग्णालयातील रिक्त पदे व कोविड मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढणे अशा विविध गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक अतिरिक्त शल्यचिकित्सक तसेच वैद्यकीय अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली. सोबतच अग्निशमनाबाबत जी कामे रेंगाळलेली आहे याकरिता संबंधित विभागाच्या वरिष्ठांना खडेबोल सुनावले. व अग्निशमना संदर्भात ठप्प असलेली कामे त्वरित पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले. गजिल्हा ग्रामीण रुग्णालयात एम आर आय, एनजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सुविधा नसल्याने गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत असून अशा दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खोरी यातच सरकार गुंतले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देखील असून गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला योग्य न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून जिल्ह्याच्या रक्त साठ्यात भर घालावी अशी विनंती देखील पोलीस विभागाला करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.


