
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने राज्यात जोरदार मुसंडी मारली.तेरा लोकसभेच्या जागा
जिंकून काॅग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.या विजयाने काॅग्रेस गोटात कमालीचा जोश निर्माण झाला आहे.आता येत्या काळात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.अशात अनेक वर्षापासून पक्षात काम करणा-या नेत्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे.दरम्यान बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसची उमेदवारी जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील येणा-या प्रत्येक तालुक्यातील पक्षाच्या शेकडो पदाधिका-यांनी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गावी जात त्यांची भेट घेतली.आणी संतोषसिंह रावत यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे.पण यावेळी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गडाला मोठाच सुरूंग लागला.खासदाराची निवडणूक हारल्यानंतर आता मुनगंटीवार पुन्हा याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काॅग्रेस कार्यकर्ते पुन्हा नव्या दमाने पक्षाच्या कामाला लागले आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशावेळी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा झटका देण्यासाठी काॅग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत.सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात पक्षाने संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिल्यास पक्षाचा विजय होउ शकतो.हा दावा करित बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो महत्वाच्या पदाधिका-यांनी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या गोंदिया जिल्हयातील सुकळी या गावात भेट घेतली.संतोषसिंह रावत हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते आहेत.त्यांनाच उमेदवारी दयावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यापूढे मांडली.
त्यांची हि भावना लक्षात घेता नाना पटोले यांनी आपली मागणीची दखल घेत असल्याचे सांगत वरिष्ठांकडे याबाबतची माहिती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.संतोषसिंह रावत हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांचे कटटर समर्थक मानल्या जातात.ते अनेक दशकांपासून काॅग्रेससोबत एकनिष्ठतेने काम करित आहेत.मूलचे नगराध्यक्ष,मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद,जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.सध्या ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष आहेत.


