Sunday, June 28, 2026
spot_img

“या” नगराध्यक्षांवर अविश्वाचा ठराव पारित सतरा पैकी सोळा नगरसेवकांनी विरोधात केले मतदान

चंद्रपूर:-

नगरसेवकांना विश्वासात न घेणे,आपल्याच मनमर्जीने कारभार करणे,बिल काढण्यासाठी पैशाची मागणी करणे असे विविध आरोप करित नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला होता.आज नगरपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत चक्क सतरा पैकी सोळा नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात मतदान केले.यामुळे गोंडपिपरीच्या नगराध्यक्षा सविता कुळमेथे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आला आहे.एकीकडे काँग्रेसची सत्ता असलेल्या या नगरपंचातीतील सत्ताही गेली.अनं काॅग्रेसचे नगरसेवकही आता शिंदे गटासोबत गेल्याने माजी आमदार सुभाष धोटे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

सतरा सदस्यीय गोंडपिपरी नगरपंचायतीवर काॅग्रेसची सत्ता आहे.शिवसेना उबाठाच्या मदतीने महाविकास आघाडीने आपले सत्तासमीकरण बसविले.काॅग्रेसच्या सविता कुळमेथे या नगराध्यक्षा तर शिवसेनेच्या सारिका मडावी या उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.दरम्यानच्या काळात नगराध्यक्षा कुळमेथे या सदस्यांना विश्वासात घेत नाही.त्या मनमर्जीने कारभार चालवितात.बिल काढण्यासाठी पैशाची मागणी करतात असे अनेक आरोप झाले.सत्तापक्षातील काॅग्रेसच्या इतर नगरसेवकांनीही त्यांच्या या कारभाराला विरोध केला.यानंतर हि संधी साधत भाजप,काँग्रेस व शिवसेना गटाचे नगरसेवक एकत्र आले.त्यांनी नगराध्यक्षाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.प्रशासनाच्या लेटलतीफ धोरणामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला.

नगराध्यक्षाचा कालावधी पूर्ण करण्याच्या काहीच दिवस अगोदर महायुती सरकारने एक निर्णय देत नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्ष केला.अनं जुन्या नगराध्यक्षांना पुन्हा आपसूकच मोठी संधी मिळाली.शासनाच्या या निर्णयानंतर नगराध्यक्षाना पायउतार करण्याचे विरोधकांचे स्वप्न भंगले.पण विरोधकांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरले.पाठपूरावा केला.दरम्यान परवा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याप्रकरणात आता अविश्वास दाखल करणा-या पंधरा नगरसेवकांना बोलावून त्यांचे मनोगत जाणून घेतले.दरम्यान आज 25 रोजी गोंडपिपरी नगरंपचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत नगराध्यक्षा सविता कुळमेथे यांच्याविरोधात सतरा पैकी चक्क सोळा नगरसेवकांनी मतदान केले.यानंतर त्यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आता पारित झाला आहे.दरम्यान ठराव पारित झाल्यानंतर विरोधकांनी नगरपंचायतीसमोर फटाके फोडून आंनद साजरा केला.उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, मुख्याधिकारी विवेक चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती.

कसे असेल सत्तासमीकरण
गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये कुठल्याच पक्षाला बहूमत नाही.काॅग्रेसने शिवसेना उबाठासोबत हातमिळवणी करित सत्ता स्थापन केली होती.आता अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर भाजपने आपली सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.काॅग्रेस व शिवसेना उबाठाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेले आहेत.त्यादृष्टीने बघितल्यास शिंदे गटाची ताकद आता वाढली आहे.अशावेळी आता येणा-या काळात नगरपचंायतीचे सत्तासमीकरण कसे असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

धोटेंना धक्का
राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काॅग्रेस आधीच बॅकफुटवर आहे.अशात आता काॅग्रेसच्या नगराध्यक्षांवर काॅग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षाशी हातमिळविणी करित अविश्वास आणला.त्यामुळे हा माजी आमदार सुभाष धोटे यंाना मोठा धक्का मानला जात आहे.ज्या गोंडपिपरीतून नेहमीच काॅग्रेसला मोठे मताधिक्य मिळायचे तिथेच आता पक्षाची अशी अवस्था झाल्याने येणा-या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या निवडणुकातही याचीच पुनरावृत्ती होणार का याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!