चंद्रपूर:-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होतांना दिसत आहे.सुधीर मुनगंटीवार,प्रतिभा धानोरकर यांच्यात होत असलेल्या या लढतीकडे सा-यांचेच लक्ष आहे.मुनगंटीवारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षात इनकंमिंगचे सत्र सुरू आहे.अशात यात पुन्हा एकाची भर पडली आहे.चंद्रपुरातील राष्ट्रवादी काॅग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते,सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष,मध्यवर्ती बॅकेचे संचालक उल्हास करपे यांनी भाजपची वाट धरली आहे.नुकताच त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. उल्हास करपे यांच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला चंद्रपुरात चांगलाच हादरा बसला आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.यातील चंद्रपूरच्या रंगतदार लढतीची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे.राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार,आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होत आहे.दोन्ही उमेदवार विजयासाठी जिवाचे रान करित आहेत.अश्रू,जात,विकास,‘‘बहिण’’भाऊ अशा अनेक मुद्द्यांनी जिल्हयातील राजकारण ढवळून निघाल आहे.काॅग्रेस,भाजपचे कार्यकर्ते समाजमाध्यमातून चांगलेच बाणीत पडले आहेत.जूने संदर्भ शोधून वाॅर,प्रतिवार केल्या जात आहे.कुठल्याही परिस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांचा विजय व्हायला हवा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.दुसरीकडे प्रतिभा धानोरकर या बहूमताने विजयी होतील असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.
याचदरम्यान आता शरद पवार गटाचे नेते उल्हास करपे यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे.चंद्रपूर जिल्हयातील धाबा येथे सुधीर मुनंगटीवार यांची प्रचारसभा झाली.यावेळी करपे यांनी प्रवेशाची भूमीका घेत मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी ताकदीने काम करण्याची ग्वाही दिली आहे.उल्हास करपे हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते राहिले आहेत.त्यांना सहकार क्षेत्राचा मोठा अनूभव आहे.मध्यवर्ती बॅकेचे ते गेल्या बावीस वर्षापासून संचालक पदी कार्यरत आहेत.मानद सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे होते.सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून हजारो शेतक-यांशी ते थेट जुडले आहेत.उल्हास करपे यांनी आता भाजपत प्रवेश केला आहे.त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा व संपर्काचा पक्षाला मोठा फायदा होईल असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.


