चंद्रपूर:-
देशातील सर्वात मोठया निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे.भाजपने या निवडणुकीत ‘‘चारशेपार’’ चा नारा दिला आहे.तर काँग्रेस भाजपाच्या या ना-याला संविधान बदलविण्याचे कटकारस्थान असल्याचे सांगत आहे.भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे.देशात एवढी भिषण परिस्थिती असतांना नैतिक मुल्य जोपासणारी माणस तटस्थ व शांत राहू शकत नाही,असे सांगत पर्यावरणवादी बंडू धोतरे आता हुकुमशाहीविरोधात मैदानात उतरले आहेत.त्यांनी आपली सविस्तर भूमीका मांडणारे पत्र लिहीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.चंद्रपूरमध्ये बंडू धोतरेच्या काँग्रेसप्रवेशानंतर आता तरूणाईत जोश निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पुर्व विदर्भातील पाच मतदारसंघात टोकाचे युध्द पेटले आहे.अनेक ठिकाणी काँग्रेस,भाजप मध्ये थेट लढत होत आहे.अशात सर्वांचे लक्ष मात्र चंद्रपूरच्या लढतीकडे लागले आहे.चारदा भाजपला लोकसभा निवडून देणा-या हंसराज अहीरांना बाजूला सारत भाजपने यावेळी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे.त्यांच्या प्रचारासाठी दस्तूरखूद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली.भाजपचे अनेक स्टार प्रचारक त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करित आहेत.दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत.केवळ “बगीचे” बांधून विकास होत नाही.तरूणांना रोजगार देण्यासाठी मुनगंटीवार कसे अपयशी झाले हा मुद्दा घेत धानोरकर आपला आवाज बुलंद करित आहेत.प्रत्यक्ष मतदानाकरिता आता फार काळ उरला नाही.अशात अंतीम टप्प्यात आलेल्या या निवडणुकीत आपलाच डंका कसा वाजेल यासाठी उमेदवार अक्षरशः जिवाचे रान करित आहेत.यासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काय काय करता येईल ते करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.
विविध पक्षातील नेत्यांना भाजप आयात करित आहे.अशावेळी कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या पर्यावरणवादी बंडू धोतरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.एक भले मोठे पत्र लिहीत त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे.आपला भारत देश इतिहासाच्या एका निर्णायक टप्प्यावर आहे.अशा परिस्थीतीत नैतिक मुल्य जोपासणारी मंडळी तटस्थ किंवा शांत राहू शकत नाही.देशाचा आत्मा धोक्यात आला आहे.गेल्या काही वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मंथन करतांना आता ठाम भूमीका घेण्याची वेळ आली आहे.असे सांगत बंडू धोतरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.सध्याची भिषण परिस्थिती लक्षात घेता आता काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नसल्याचे धोतरे यांचे म्हणणे आहे.बंडू धोतरे हे गेल्या विस वर्षापासून पर्यावरणाचे काम करित आहेत.आपला जिव धोक्यात घालून त्यांनी अनेक “वाघांना” सरंक्षण दिले आहे.मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी त्यांचे योगदान हे अतिशय मोलाचे राहिले आहे.त्यांनी केलेल्या आंदोलनाची देशपातळीवर दखल घेण्यात आली. अदाणींना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे मित्र मोदी हे वारंवार प्रयत्नशिल असतात असे सांगीतल्या जाते.त्याच अदाणीच्या विरोधात बंडू धोतरे यांनी चंद्रपुरात मोठे आंदोलन उभारले होते.हुकुमशाहीच्या विरोधात बंडू धोतरे आता मैदानात उतरले असून त्यांच्या या भूमीकेमुळे चंद्रपूर मतदारसंघातील तरूणाईत बराच जोश निर्माण झाला आहे.



