Monday, October 12, 2026

मुहूर्तावर पार पडला विवाह,निमकरांनी वधू वराला दिली ‘‘सत्काराची भेट’’

चंद्रपूर:-
हल्ली विवाहसमारंभाचा फारमॅटच बदलला आहे.सकाळी अकरा वाजता असणा-या लग्नाला दुपारचे चार वाजतात.आधीच चाळीशीवर गेलेल्या तापमानात विवाहासाठी तासनतास वाट बघताबघता आबालवृध्दांची चांगलीच गैरसोय होते.पण काही एक केल्या लग्न वेळेवर लागतच नाही.अशात आज दि.( 5)राजूरा येथे मात्र सारेच सोपस्कार पार पाडीत,विवाहाचा मुहूर्त न चुकता अगदी वेळेवर लग्न लागले.अलीकडे दुर्मीळ झालेला हा प्रसंग बघून उपस्थितांनाही मोठेच समाधान लाभले.विवाहसमारंभास हजेरी लावणारे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी वेळेवर लग्न लावल्याबद्दल आईवडिलांचे कौतुक करीत वधू वराला लग्नमंडपातच सत्काराची भेट दिली.

सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. विवाह धुमधडाक्यात करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मात्र, या साऱ्यात विवाहाचा मुहूर्त साधण्यात ते जाणीवपूर्वक चुकत आहेत. यादरम्यान होणाऱ्या विलंबामुळे लग्नासाठी आलेले सर्व आबालवृद्ध ताटकळत असतात. हा प्रकार गावखेड्यापासून शहरी भागापर्यंत सर्वत्र बघायला मिळतो. त्यामुळे कोणतेही लग्न वेळेवर लागत नाही असा प्रत्येकाचा समज झाला आहे. मात्र, हा समज बामनवाडा येथील वसंतराव मोहनकर यांचे चिरंजीव शैलेश आणि राजुरा येथील क्रिष्णाजी खामनकर यांची कन्या शिवानी यांनी खोटा ठरविला. ठरलेल्या या घटी मुहूर्तावर मोहनकर व खामनकर कुटुंबीय यांनी विवाह सोहळा अगदी वेळेवर पार पाडल्याने या सोहळ्याकरिता उपस्थित असलेल्या वऱ्हाडी पाहुणे मंडळींना कोणताही मनस्ताप करण्याची वेळ आली नाही. या विवाह सोहळ्याला उपस्थित राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुहूर्ताला सत्काराची भेट म्हणून वर-वधूचा माता-पित्यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. अरुण धोटे, चंद्रपूर ऍग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, पं. स. राजुरा चे माजी सभापती संतोष चन्ने, चंद्रपूर येथील अतुल मामिडवार सह मान्यवर उपस्थित होते.

निमकरांनी सुरु केला उपक्रम
वेळेवर जर लग्न लागत असेल तर मातापित्यांसह वधूवराला सत्काराची भेट दिल्या जाते. त्यांचे कौतुक केल्या जाते.राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. या प्रकारामुळे लग्नात अनेकांची गैरसोय टळते शिवाय अनेकांना वेळेवर लग्न लावण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळते. आज राजुरा येथे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेल्या सत्कारानंतर खामणकर,मोहनकर कुटुंबीय चांगलेच सुखावले.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!