
चंद्रपूर:-
लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा झालेला पराभव भाजप अजूनही विसरू शकली नाही.पराभवाची कारणमिमांसा करतांना अनेक कारणांपैकी पक्षातील नेत्यांनी केलेले विरोधी काम हा एक महत्वाचा फक्टर ठरल्याचे सांगण्यात आले.अशा लोकांची यादी करण्याचे काम सुरू झाले.
अशातच काल दि.2 रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते,भाजयुमोचे जिल्हा सचिव इंजि.वैभव पिंपळशेंडे यांना पदावरून निष्काषीत करण्यात आले.सोबतच त्यांची भारतीय जनता पार्टीतून कायस्वरूपी हकालपटटी करण्यात आली.भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी यासंदर्भातील एक पत्र जारी केले.पिंपळशेंडे यांच्यावर विरोधी पक्षाच्या बैठकीत,आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा ठपका ठेवण्यात आला.
काय ठरले कारण…….!
राज्याचे वने,सांस्कृतिकार्य,मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनंगटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.या मतदारसंघात पोंभूर्णा तालुका मोडतो.पोंभुर्ण्यात मुनगंटीवारांनी मोठया प्रमाणावर विकासकामे केली आहेत.पण त्यांनी केवळ इमारती बांधण्याचे काम केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो.अशात पोंभुर्णा तालुक्यातील ग्रिड पाणीपूरवठा योजना सुरू करण्यात आली नाही.परिणामी 15 गावातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.या मागणीला घेत इंजि.वैभव पिंपळशेंडे यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते.दरम्यान या प्रश्नांवर शिवसैनिकांनी आक्रमक रूप धारण करित संवर्ग विकास अधिका-यांच्या अंगावर गढूळ पाणी फेकले होते.सोबत कार्यालयातच मडके देखिल फोडले.दस्तूरखुद राज्याच्या मंत्रीमहोदयांच्या मतदारसंघात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.हा मूददा बराच चर्चेेचा ठरला.पाणीप्रश्नाच्या मुददावरून करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे इंजि.वैभव पिंपळशेंडे यांनी देखिल सक्रिय भूमीका बजावली होती.नेमका हाच धागा पकडत आता त्यांना भाजप पक्षाच्या पदावरून व कायमस्वरूपी निष्काषीत करण्यात आले.
कोण आहेत पिंपळशेंडे …..!
वैभव पिपंळशेंडे हे पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील रहिवाशी आहेत.त्यांनी नागपूरातून इंजिनीअरींग केली.तर पुण्यातून एमबीए चे शिक्षण घेतले आहे.दोन वर्ष पिंपळशेंडे यांनी मुंबईत नौकरी केली.यानंतर ते गावाकडे परतले.गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी विविध सामाजिक कामे केलीत.परिसरातील अनेक गावातील गरजूंना त्यांनी हक्कचे घरकूल मिळवून दिले.यानंतर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारणात आले.भाजपचा युवा चेहरा,त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची भाजमुयो च्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली.गेल्या वर्षभरापासून ते या पदावर कार्यरत होते.
होय,जर हा गुन्हा असेल तर तो मी करणारच……. !
पोभुर्णा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तीस कोटी रूपयाची योजना सुरू करण्यात आली नाही.यामुळे पंधरा गावातील हजारो नागरिकांना दिड महिन्यापासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे.अशावेळी आपण हा प्रश्न मांडला.प्रशासनाला निवेदन दिलीत.त्याचा काही एक फायदा झाला नाही.अशावेळी आंदोलनाशिवास दुसरा पर्याय नव्हता.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो.हा जर पक्षाला गुन्हा वाटत असेल तर असे गुन्हे मी वारंवार करणार आहे.अशी प्रतिक्रीया वैभव पिंपळशेंडे यांनी दिली.नेत्यांना चाटूकार नेते,कार्यकर्ते हवे आहेत असे सांगत चांगल्या कार्यकर्त्यांचे पंख छाटण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील जनता आपणासाठी महत्वाची असून त्यांच्या न्यायमागणीसाठी आपला लढा कायमसाठी सुरू राहील असेही ते म्हणाले.
सोशल मिडीयावरही चर्चा
भाजपचे जिल्हा सचिव इंजि.वैभव पिंपळशेंडे यांना पक्षातून निष्काषीत करण्याच्या मुदयाला घेत आता समाजमाध्यमात चर्चांना उधान आले आहे.भाजपचे अनेक नेते,कार्यकर्ते पिंपळशेंडे यांच्या विरोधी भूमीकेवर प्रहार करित आहेत.तर दुसरीकडे पिंपळशेंडे यांच्या समर्थनातही त्यांच्या कार्यकर्त्याची मोठी टीम समोर आली आहे.भाजपचे पक्षातून जरी काढले असले.तरी तुम्ही आपली लढाई सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ते ठासून सांगत आहेत.


