
चंद्रपूर
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष रवींद्र मरपल्लीवर हे भाजपवासी झाले.खाली पद भरण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी वासुदेव पाल यांना तालुका नेतृत्वाची संधी दिली. अनं मग काय तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले. अनेकदा काँग्रेसविरोधात भूमिका घेणाऱ्या पाल यांना केवळ “स्व”प्रेमापोटी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी तालुकाध्यक्ष बनविले असा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हा निर्णय बदलवीला गेला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी हा वाद उफाळून आल्याने आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपचे जेष्ठ नेते, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुका राजकीय दृष्टीने महत्वाचा मानला जातो.पोंभुर्णात काँग्रेस ची बरीच ताकत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. हा भाजपला धक्काचं होता.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र मरपल्लीवार यांनी नेतृत्वाची झलक दाखविली अनं ते सभापती झाले. दरम्यानच्या काळात भाजपने काँग्रेसचा हा मोठा चेहरा आपल्याकडे वळवीला. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकीचे दमदार प्रदर्शन केले.ज्या तालुक्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची तिजोरी बरीच खाली केली. त्याच तालुक्यातील मतदारांनी मुनगंटीवारांना नाकारले.
लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यात कमालीचा जोश निर्माण झाला. अशातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी वासुदेव पाल यांची पोंभुर्णा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली.या निवडीची माहिती कळताच तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी पाल यांच्या निवडीचा कडाडून विरोध केला. सुभाष धोटे यांनी केवळ “स्व”प्रेमापायी पाल यांची निवड केली. याबाबत जेष्ठ व स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. पाल यांची राजकीय भूमिका भाजपला पोषक राहिली आहे. त्यांनी पक्षाचा आदेश झूडकारून पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.सुभाष धोटे यांनी केवळ आपल्या मनमर्जीने हा कारभार केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान पाल यांची केलेली निवड तातडीने रद्द करावी. व सर्वसहमतीने नवीन तालुकाध्यक्ष निवडावा अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले.
पोंभुर्णा तालुका काँग्रेस च्या अध्यक्षपदाची निवड करतांना स्थानिक कार्यकर्त्यांना अजिबात विश्वासात घेतल्या गेले नाही. हा प्रकार पक्षहितासाठी कदापिही बरा नाही. निवडण्यात आलेले तालुकाध्यक्षपद तातडीने बदलवावे हीच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मनभावना आहे.
विनोद थेरे
काँग्रेस नेते,पोंभुर्णा


