
गडचिरोली
अहेरी विधानसभा मतदारसंघाचा विकास भकास झाला आहे.अनं याला कारणीभूत ठरले ते राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम.मतदारसंघातील रस्त्याची पुरती वाट लागली आहे.नागरिकांना मोठया समस्येचा सामना करावा लागत आहे.रोजगार देण्याच्या नावावर युवकांची दिशाभूल केली जात आहे.अशात मंत्रीमहोदय मात्र हेलीकाॅप्टरने फिरत आहे.त्यांनाही हे रस्ते बघवत नसावेत असा निष्क्रीय नेतृत्वाला येथील मतदार यावेळी चांगलाच धडा शिकवितील असे म्हणत अमंरीशराव आत्राम यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर निशाना साधलाय .सध्या संपूर्ण राज्यात अहेरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय पारिवारीक संघर्षाचीच चर्चा सुरू आहे.अशात नुकतच अमंरीश आत्राम यांनी पुन्हा एकदा धर्मराव आत्रामांवर टिकेचे बाण सोडले आहेत.आत्रामांनी क्षणाचा विलंब न करता या टिकेवर उत्तर देत साडेचार वर्ष झोपी गेलेल्यांना आता कुठे जाग आल्याचे म्हणत पलटवार केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत पराभव झाला.गडचिरोलीतही सत्तापलट झाली.आत्रामांच्या बालेकिल्ल्यात काॅग्रेसला मिळालेल्या मतांची आघाडी त्यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे.यानंतर धर्मरावबाबा आत्राम व त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांच्या संघर्षाची ठिणगी पेटली.यावरून मोठा शाब्दिक वादविवादही झाला.दरम्यान यानंतर भाग्यश्री यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश घेत वडिलांना आव्हान दिले.पण हि पितापुत्रीची आपली सत्ता कायम ठेवण्याची नौटंकी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.अनेकांनी समाजमाध्यमातून हा सूर आवळला.
महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांनाच उमेदवारी मिळणार आहे.यात सध्यातरी काही शंका नाही.यामुळे भाजपमध्ये असलेले अमंरीश आत्राम हे कमालीचे अस्वस्थ आहेत.त्यांना कुठल्याही परिस्थीतीत विधानसभेची निवडणूक लढवायची आहे.माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.यासाठी त्यांनी तयारीदेखिल सुरू केली आहे.एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.मतदारसंघातील रस्त्याची पुरती वाट लागली असतांना हे हेलीकाॅप्टर वरून फिरायला लागले आहेत.जनतेच्या नजरेतून उतरलेले हे महोदय स्वतलाच ‘‘दिलो का राजा’’ म्हणत चित्रपट काढायला लागले आहेत.बेरोजगारांची फसवणूक करणा-या या मंत्रीमहोदयांना आता येथील जनता चांगलाच धडा शिकविणार असल्याचा टोला त्यांनी हाणला.
धर्मरावबाबांचा पलटवार..
माजी पालकमंत्री तथा भाजप नेते अमंरीश आत्राम यंानी टिका केल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी पलटवार केला आहे.एटापल्ली तालुक्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी अमंरीश आत्रामांवर हे झोपलेले नेते असल्याचे म्हटले.साडेचार वर्ष झोपून होेते.निवडणूक येताच त्यांना जाग आली आहे.मी जरी हेलीकाॅप्टर ने फिरत असलो तरी मी सातत्याने लोकांच्या कामात असतो.हे तर रस्त्यावर कधी येत नाही.घरी आलेल्या कार्यकर्त्यांना भेटत नाही.ते नेहमी कुंभकर्णी झोपेत असतात.ज्या माणसाने कधी कामच केले नाही.त्याला समस्या काय आहेत हे तरी माहित आहे का.असा पलटवार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.



